Omicron Cases in Aurangabad: Omicron Cases In Maharashtra Home Quarantine Now Closed In Aurangabad | ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे मोठा निर्णय, ‘या’ जिल्ह्यात होम क्वॉरंटाइन आणि RTPCR चे नियम बदलले | Maharashtra Times
औरंगाबाद : ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे भारतासह जगाची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात आणि स्थानिक पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी विवध कडक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. तर सोमवारी औरंगाबादचा व्यक्ती मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली असून, यापुढे होम क्वॉरंटाइन बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (omicron cases in maharashtra Home quarantine now closed in Aurangabad)
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाली. यावेळी ओमिक्रॉन संसर्ग तपासणीमध्ये महत्वच्या ‘जिनोम सिक्वेन्सींग’ तपासणीसाठी प्रयोगशाळेचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याचे निर्देश घाटी प्रशासनाला देण्यात आले. तसेच यापुढे जिल्ह्यात कोणत्याही करोनाबाधित रुग्णाला घरी उपचार घेता येणार नसल्याचे सांगत होम क्वॉरंटाइन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले. सोबतच यापुढे आता प्रत्येक खाजगी रुग्णालयात RTPCR चाचणीची सोय करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे लक्षणे नसणारे कोरोनाबाधितांना डिटेक्ट करणं सोपं होणार आहे. तर डिसेंबर माहिन्याअखेर मोठे उत्सव, लग्न समारंभ, आणि अनावश्यक गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले.
जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढवाव्यात, ज्या नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी तो तात्काळ घ्यावा, लसीकरणासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ऑक्सीजन बेड आणि आयसीयु बेड, यासह विशेष बेडची सुविधा सज्ज ठेवण्याबाबत यावेळी आरोग्य यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. (omicron cases in maharashtra Home quarantine now closed in Aurangabad)