हायलाइट्स:
- सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या स्वयंसेवकांकडून बाणकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
- बाणकोट किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा
- भलामोठा तोफगोळा आणि दरवाजाच्या लोखंडी कड्या आढळल्या
- बाणकोट ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला ऐतिहासिक ठेवा
काल सोमवारी १९ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याच मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील देवडी/अलंगामध्ये २ इंच लांबी-रुंदी व १० इंच व्यास असलेला लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी दरवाजाच्या जंग लागलेल्या कड्या सापडल्या आहेत. या वस्तूंची माहिती सहाय्यक संचालक विलास वाहने यांना फोनवरून देण्यात आली व छायाचित्र आणि पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांनी सुचविल्याप्रमाणे सदर वस्तू या स्थानिक बाणकोट ग्रामपंचायत सरपंच हमीदा परकार यांच्याकडे सुपूर्द करून त्या ग्रामपंचायतीत ठेवण्यात आल्या आहेत. पुरातत्व विभाग अधिकारी हे बाणकोट किल्ल्याला भेट द्यायला येतील; तेव्हा तोफगोळा व कड्या आपल्या ताब्यात घेतील, अशी माहिती श्रीवर्धन विभाग अध्यक्ष योगेश निवाते आणि दापोली तालुका प्रशासक ललीतेश दवटे व मंडणगड तालुका प्रतिनिधी राहुल खांबे आणि प्रतीक्षा सापटे यांनी दिली.
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी १४ वर्षांपूर्वी स्थापन केली आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाचे कार्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील गडकोटांवर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. आजवर संस्थेमार्फत १८०० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबवल्या असून, २००० किल्ल्यांच्या दूर्गदर्शन मोहिमा घेण्यात आल्या आहेत. तसेच लोकवर्गणीतून प्रतापगड आणि वसंतगड तटबंदी बुरूज बांधकाम, १३ प्रवेशद्वार व ४० तोफांना तोफगाडे बसविण्यात आलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट किल्ल्यावर सन २०२० मध्ये संस्थेमार्फत लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच सागवानी प्रवेशद्वारही बसविण्यात येणार आहे. सहाय्यक संचालक रत्नागिरी, राज्य पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाने ही कामे होत आहेत. या स्वच्छता मोहिमेत श्रीवर्धन, दापोली व मंडणगड येथील संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ सहभागी होते, अशी माहिती योगेश निवाते यांनी दिली.