हायलाइट्स:
- जिल्ह्यातील ३ नगरपंचातींसाठी मतदान
- दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्षांची आघाडी
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्षांची आघाडी असं चित्र आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या पॅनलविरोधात भाजपा खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना नेते अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रित मोट बांधली आहे. रोहित पाटील यांनी विरोधकांना जोरदार आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक चर्चेत आली आहे.
खानापूर नगरपंचायतीमध्ये सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांसह स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कडेगाव नगरपंचायतीमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अशी बहुरंगी लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच कडेगावमध्ये आपले उमेदवार उभे करून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढवली आहे. या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रमसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, कडेकोट पोलीस बंदोबस्तात सर्वत्र मतदारांच्या जोरदार प्रतिसादात मतदान सुरू आहे.