हायलाइट्स:
- शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे शिल्प
- हिंदुत्ववादी संघटनेनं गनिमी कावा करत केलं शिल्पाचं लोकार्पण
- संभाजी ब्रिगेडसह काही संघटना आक्रमक
साताऱ्यात हे शिल्प उभारणं हा संघाचा डाव असल्याचा आरोप इतिहास अभ्यासक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभाग, नगरपालिका तसंच एसटी महामंडळ यांची गेल्या वर्षीच भेट घेऊन हे शिल्प उभारण्याला विरोध केला होता. मात्र असं असतानाही प्रशासनाने गेल्या एक वर्षात कोणतीच भूमिका घेतली नाही. उलट हे उद्घाटन होऊ दिलं. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच आम्हाला संशय असल्याचं मत श्रीमंत कोकाटेंनी व्यक्त केलं आहे.
शिल्प तोडण्याचा इशारा
रामदास स्वामी हे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. काही मंडळींनी हा इतिहासच तोडून-मोडून सर्वांसमोर आणला आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं दाखवत लोकांची दिशाभूल करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक करत असून याचा आम्ही कायमच विरोध करत आलो आहे. साताऱ्यात बनवलेल्या या शिल्पामधून लवकरात लवकर रामदास स्वामीचं चित्र हटवलं गेलं नाही तर मात्र आम्ही ते तोडून टाकू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.