हायलाइट्स:

  • प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला अपघात
  • अपघातात ३ जण ठार झाले
  • राज्य शासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : जामनेरकडून जाणाऱ्या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण ठार झाले आहेत, तर ३ जण गंभीर असून अन्य १३ जण जखमी झाले आहेत. तारासिंग जयसिंग पाटील, तानाजी शंकर साळवे व शेख मोहम्मद उवेत आमिनोद्दीन अशी मृतांची नावे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने राज्य शासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. (जळगाव अपघात ताजे अपडेट)

अ‍ॅपेरिक्षातून भुसावळ येथून काही प्रवासी जामनेरला येत होते. गारखेड्याजवळील बेदमुथा जिनींगसमोर जामनेरकडून लाकडाने भरून जाणाऱ्या आयशरने अ‍ॅपेरिक्षाला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तारासिंग जयसिंग पाटील व तानाजी शंकर साळवे हे दोघेजण जागीच ठार झाले, तर शेख मोहम्मद उवेत आमिनोद्दीन यांना जळगावला उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. एका विद्यार्थ्यासह अन्य तिघांची परिस्थिती चिंताजनक आहे. या अपघातात तब्बल १३ जण जखमी झाले आहेत.

छत्रपती शिवरायांचा अवमान: आदित्य ठाकरे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट म्हणाले…

याप्रकरणी विजय अशोक धोटे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गिरीश महाजन यांनी मदतकार्य केले तर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कार्यवाही केली आहे.

शासनाविरुद्ध गुन्हा दाखल करा

गारखेड्याजवळ झालेला भीषण अपघात हा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे झाला असून राज्य सरकारची अनास्था यासाठी कारणीभूत ठरली आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे जीव जात असताना शासन स्वस्थ बसलेलं आहे. यामुळे राज्य सरकारवर या अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here