हायलाइट्स:
- श्रीपाद छिंदम याच्या जागेवर पुन्हा भाजपचा विजय
- पराभवानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने
- काँग्रेसकडून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मनपा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाला, ही निश्चितच खेदाची बाब आहे. पण हा पराभव केवळ प्रभारी शिवसेना शहर प्रमुख यांच्या आडमुठेपणामुळे झाला असून त्याची किंमत मात्र महाविकास आघाडीला मोजावी लागली आहे. एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे शिवद्रोही श्रीपाद छिंदमला उमेदवारी देणाऱ्या जातीयवादी भाजपचा उमेदवार पुनश्च निवडून आला याचा काँग्रेस पक्षाला खेद आहे. माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांच्या विचाराप्रमाणे शिवसेनेचे नेते चालले असते तर ही वेळ महाविकास आघाडीवर आली नसती,’ अशा शब्दांत शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘हा प्रभागच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक आहेत. या प्रभागातील मतदार ही काँग्रेसची ओरिजिनल व्होट बँक आहे. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार द्यावा असा प्रस्ताव आम्ही शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र काँग्रेसला ही जागा देण्यात आली नाही आणि प्रचारातही सामील करून घेण्यात आले नाही,’ असा आरोपही अनंत गारदे यांनी केला आहे.
भाजप उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक नऊसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी एकूण ३ हजार १०६ मते घेत ५१७ मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी (२५८९) दुसऱ्या स्थानी तर सुरुवातीला आघाडी घेतलेले मनसेचे पोपट पाथरे (१७५१) तिसऱ्या स्थानी फेकले गेले.