मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी आज मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आले असून उद्यापासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमितपणे करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे.

मालवाहतूक गाड्यांना अडवू नये

शासनाच्या वतीने भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी आडवू नये. त्यांना मार्गस्थ करण्यात यावे, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. याबाबत त्यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here