हायलाइट्स:
- वाकड परिसरात तरुणीची आत्महत्या
- चार मजली इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
- आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
नम्रता वसईकर हिचे ‘बीटेक’चे शिक्षण झाले असून तिच्या लहान भावाला नोकरी मिळाल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे कुटुंब धुळे जिल्ह्यातून पुण्यातील वाकड येथे स्थायिक झाले होते. तिची आई गृहिणी असून वडील चप्पल-बूट शिवण्याचे काम करतात. नम्रता ही सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेसहा वाजता घराबाहेर पडली आणि माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर जाऊन तिने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला व इमारतीच्या छतावरून उडली मारली. यात तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर मार लागला.
या घटनेबाबत एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नम्रता हिच्या चेहऱ्यावरील स्कार्फ कापून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटली नाही. त्यानंतर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, नम्रता उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी शोध सुरू केला असता सायंकाळी उशिरा ते वाकड पोलीस ठाण्यात गेले. तेथे नम्रताचा फोटो पोलिसांना दाखवला असता तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना दिली. नम्रताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.