हायलाइट्स:
- कर्जतमध्ये निकालाआधीच फुटले फटाके
- मतदान संपताच राष्ट्रवादीचा जल्लोष
- निवडणूक निकालात कोण मारणार बाजी?
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवारी १२ प्रभागासाठीचे मतदान सायंकाळी साडेपाच वाजता संपले. मतदान पूर्ण होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडले. निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा करत याचे श्रेय आमदार रोहित पवार व माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना दिले.
कर्जत नगरपंचायतीची ही निवडणूक राज्यभरात गाजली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर फटाके फोडून निकालाआधीच विजयाचा जल्लोष साजरा केला. काही प्रभागात भाजपच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होईल असा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मात्र या जल्लोषापासून स्वत:ला दूर ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निवडणूक निकालात नेमकं काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.