हायलाइट्स:
- कल्याणजवळील मलंगगड परिसरात सरकारी जमिनींवर जीन्स वॉश कारखाने
- जलस्त्रोत प्रदूषित आणि शेतीचे नुकसान होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार
- चिरड आणि करवले गावात कारवाई, कारखाने जमीनदोस्त
- तहसीलदारांच्या आदेशाने कारखान्यांवर केली कारवाई
मलंगगड परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जीन्स वॉश कारखाने बेकायदा उभारण्यात आले आहेत. यापैकी काही कारखाने हे खासगी जमिनींवर, तर काही कारखाने सरकारी जमिनींवर उभारण्यात आले होते. या कारखान्यांमुळे जलस्रोत दूषित होत आहेत. तसेच शेतीचेही नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी तहसीलदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे स्थानिकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत अंबरनाथच्या तहसीलदारांनी दोन कारखान्यांवर तोडक कारवाई केली. यामध्ये मौजे चिरड इथल्या सरकारी सर्व्हे नंबर २६ वर असलेला कारखाना आणि मौजे करवले इथल्या सरकारी जमीन सर्व्हे क्रमांक २६ वर असलेला कारखाना अशी दोन बांधकामे जेसीबी लावून तोडण्यात आली. तहसीलदार प्रशांती माने यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी अंबरनाथचे नायब तहसीलदार संभाजी शेलार, तलाठी सातपुते, नाईकवडे, तसंच पोसरी आणि करवले ग्रामपंचायतीचे संतोष वजाळे उपस्थित होते.
मात्र या कारवाईत सातत्य असले पाहिजे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. कारण एकदा कारवाई केली जाते. त्यानंतर परत जीन्स वॉश कारखाने उभे राहतात आणि त्याकडे सरकारी अधिकारी लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यापुढेही कारवाई केली जाईल का? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान यापुढे देखील मलंगगड परिसरात अशीच धडक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले.