हायलाइट्स:
- चिपळूण बंदला शंभर टक्के प्रतिसाद
- चिपळूण बचाव समितीने सुरू केलंय आंदोलन
- ६ डिसेंबरपासून सुरू आहे साखळी उपोषण
- नद्यांमधील गाळ तात्काळ काढण्याची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला असलेल्या महापुराच्या धोक्यापासून वाचवावे, यासाठी नद्यांमधील गाळ काढा, या प्रमुख मागणीसाठी बचाव समितीचे साखळी उपोषण गेले काही दिवस सुरू आहे. सोमवारी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांनी मूक मोर्चाही काढला. या मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ६ डिसेंबरपासून हे साखळी उपोषण सुरू आहे. आपला आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचावा, यासाठी आक्रमक पवित्रा घेत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे.
महापुराने अनेकांच्या जगण्यासाठीचा आधार हिरावून घेतला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोकणातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिपळूणला महापुरापासून वाचवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. येथील वाशिष्ठी आणि उपनद्यांमधील गाळ काढण्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या चिपळूणकरांच्या पदरात सरकार समाधानकारक निधी उपलब्ध करू देत नसल्यामुळे चिपळूण शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिकांनी रविवारी भीक मांगो आंदोलन केले. सोमवारी हजारो नागरिक सरकारच्या विरोधात निषेध मूक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक नागरिकाने सरकारचा निषेध म्हणून काळी फित बांधून हातात भीकेची रक्कम स्वीकारण्यासाठी एक डब्बा घेऊन आपल्या मूक भावना व्यक्त केल्या होत्या. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. सरकारने याची तात्काळ दखल घेऊन कोकणातील हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार शेखर निकम यांनी केली. तसेच येथील नागरिकांच्या भावना सभागृहात मांडल्या.