मालेगाव सामान्य रुग्णालयात करोनाचे दोन संशयीत रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर नियमितपणे उपचारही सुरू आहेत. शिवाय सध्याच्या संकटाच्या काळात सामान्य रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. असे असताना आमदार मौलाना मुफ्ती यांनी रुग्णालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप केला. मौलाना तसेच त्यांच्यासोबतचे आलेले कार्यकर्ते थेट वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णालयातील इतर महिला व पुरुष डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस भयभीत झाले.
आमदारांसोबतच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी डॉ. डांगे, डॉ. पाटील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यामुळे भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रुग्णालयासमोर ठिय्या दिला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रुग्णालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांदेखत झाला. पोलिसांनी यावेळी कोणतीही कारवाई केली नाही.
करोनाचे संशयीत रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तसेच संचारबंदीचा आदेश असताना आमदारांसह इतका मोठा जमाव रुग्णालयात घुसतोच कसा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकारानंतर रात्री उशिरा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. रात्री उशिरापर्यत पोलीस कारवाई सुरू होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times