हायलाइट्स:
- बायकोची हौस पुरवण्यासाठी त्याने अवलंबला
- दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- सराईत दुचाकी चोरट्यासह सहा चोरांना बेड्या
- ४५ दुचाकींसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
आपल्या लाडक्या बायकोसह हौसमौज करण्यासाठी आणि पैसे कमी पडतात म्हणून एक चोरटा महागड्या दुचाक्या चोरी करायचा आणि त्या विकायचा. या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सलगरे असे चोरट्याचे नाव असून, तो आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा. त्यानंतर या दुचाकी फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून गरजूंना स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून विकायचा. काही दुचाकी भंगारवाल्यालाही विकायचा. अखेर दीपक सलगरे आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आहे. दीपक सलगरेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्वस्त दुचाकींच्या आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाकी विकत घेऊ नयेत, असे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ यांनी केले. यापुढे अशा प्रकारे दुचाकी खरेदी करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
असा केला पर्दाफाश
कल्याण-डोंबिवली परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरट्यांच्या मागावर पोलीस होते. कल्याण परिमंडळ ३ मध्ये या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने ज्या परिसरात दुचाकी चोरी झाल्या आहेत, त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील नजर ठेवली. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक विरोधात मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
बदलापूर पाइपलाइन रोडवरील पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोची हौस पुरवण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने दुचाकी चोरी करायचा. दीपक दुचाकी चोरी करायचा व त्या साथीदार राहुल डावरे याच्या मदतीने नागरिकांना स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून विकायचा. या दुचाकी फायनान्स कंपनीमधून आणल्या आहेत असे तो बतावणी करायचा. काही दुचाकी त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू याला देखील विकल्या. बबलू या दुचाकी स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्यामार्फत इतरांना विकत होता. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले. या प्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरेसह सहा जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी १७ दुचाकी, दुचाकींचे इंजिन व इतर पार्ट व एक कटर मशीन असा आठ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, असा संशय पोलिसांना असून, पुढील तपास सुरू आहे.