हायलाइट्स:
- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील बॅग हिसकावून चोरटा फरार
- तब्बल ५ लाख २७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास
- रत्नागिरी रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
- कणकवली पोलीस ठाण्यात नोंद, रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा वर्ग
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकात ७ डिसेंबर रोजी पहाटे ४. ४५ वाजण्याचा सुमारास घडली. प्रवासी महिला प्रमिला यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर २१ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
याबाबत प्रमिला प्रभाकर तळेकर (६०, रा.फोंडाघाट गडगे-सखलवाडी, कणकवली) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रमिला या वसई ते कणकवली असा रेल्वेतून प्रवास करत होत्या. ७ डिसेंबरला पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ट्रेन आली. ट्रेनचा वेग कमी झाला असता, एक अज्ञात व्यक्ती प्रमिला यांच्या सीटच्या शेजारी येऊन उभा राहिली. त्यानंतर प्रमिला यांच्या हातातील लाल रंगाची बॅग जबरदस्तीने खेचून धीम्या ट्रेनमधून फलाटावर उडी मारून पोबारा केला.
बॅगमध्ये १ लाख ७० हजार रुपयांचे ४ तोळ्यांचे ३ पदरी मंगळसूत्र व सोन्याची साखळी, तीन अंगठ्या, सोन्याची चेन, हार, कुड्या, झुमके, नथ आणि रोख ९ हजार रुपये असा एकूण ५ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. कोकण रेल्वेवरील ट्रेनमधून प्रवासादरम्यान प्रवाशांजवळील वस्तू चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असून कोकण रेल्वेमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times