हायलाइट्स:
- केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथील केल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळेल
- आम्ही मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देऊ
- एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार अल्पसंख्याक मंत्रालयाला नसतो
केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथील केल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तेव्हा आम्ही मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देऊ, असे नवाब मलिक यांनी म्हटले. त्याचा प्रतिवाद करताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार अल्पसंख्याक मंत्रालयाला नसतो. अल्पसंख्याक मंत्र्यांना आरक्षण देता आलं असतं तर त्यांनी रात्रीच फाईल काढली असती, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर नवाब मलिक यांनी, ‘मी रात्रीची कामं करत नाही’, असे प्रत्युत्तर दिले. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. रात्रीचं काम करत नाही, हे तुम्ही अजित पवार यांना सुनावताय का? तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का? दादांकडून एकदा चूक झाली असेल पण म्हणून तुम्ही त्यांना वारंवार बोलणार का? हे योग्य नाही. अजितदादा आमचे मित्र आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
फडणवीस-मलिकांची जुगलबंदी
मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिका यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. पण प्रकरण हायकोर्टात गेलं आहे. कोर्ट जे सांगेल त्याची आम्ही अंमलबजावणी करू असं सांगतानाच 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. केंद्राने जर मर्यादा वाढवली तर आरक्षण वाढवून देता येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मलिक यांनी कबूल केलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. राजाला पोपट मेला कसा हे सांगता येत नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने सांगितले जात आहे, असा टोला फडणवीस यांनी मलिकांना लगावला. त्यावर नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. देवेंद्र फडणवीस सभागृहाची दिशाभूल करत आहेत. हा धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा मुद्दा नाही. 50 टक्क्यांची अट शिथील होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळेच सुटला नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.