Household Electricity Bill Recovery Drive In Aurangabad | वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी | Maharashtra Times
औरंगाबाद : वीजबिलांची थकबाकी वाढल्यामुळे घरोघरी जाऊन वीजबिल भरल्याची पाहणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करुनही नियमित बिल भरणा होत नाही. त्यामुळे जागेवर वसुलीचा महावितरणच्या ‘एम्प्लॉयी मित्र’ अॅपद्वारे बिलाचा भरणा करण्यात येणार आहे.
ग्राहकांनीही नियमित वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. परिमंडळात चार हजार ६०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. या परिस्थितीत ग्राहकांनी वीज बिल भरल्याची पडताळणी करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. ग्राहकाने वीजबिल भरले नसल्यास जागेवर वीजबिलाची रक्कम घेऊन अॅपद्वारे भरणा करण्यात येणार आहे. ग्राहकांनी अन्य पर्याय वापरून वीजबिल भरल्याचा संदेश दाखविल्यास तो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. अन्यथा, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला, औरंगाबादमध्ये ७ आगारात मोठा निर्णय
ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात लक्षणीय थकबाकी आहे. कृषिपंप, औद्योगिक, घरगुती, व्यावसायिक ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. थकबाकीच्या तुलनेत जेमतेम एक टक्के वीजबिल भरणा झाला आहे. त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
१८ लाख ग्राहकांचे दुर्लक्ष
डिसेंबरमध्ये मराठवाड्यात आतापर्यंत २८ लाख ग्राहकांपैकी फक्त १० लाख ग्राहकांनी वीजबिल भरले आहे. त्यामुळे घरी जाऊन बिलाची पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बिल भरणारे ग्राहक आणि थकबाकीत मोठी तूट निर्माण झाली आहे. परिणामी, महावितरणचा कारभार डळमळीत झाला आहे. कृषिपंपाची सर्वाधिक थकबाकी असून शेतकऱ्यांना सवलत जाहीर करण्यात आली आहे.