हायलाइट्स:
- राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय
- राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क
- राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वाढलाय -नवाब मलिक
- जानेवारी ते मे पर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता
राज्यात करण्यासाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉनचा धोकाही वाढत असून, गेल्या दोन – तीन दिवसांत रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. करोना रुग्णांची आणि ओमिक्रॉनबाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य तिसरी लाट येऊ शकते आणि राज्यात निर्बंध लावण्यात येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या पातळीवर कोणती पावले उचलण्यात येत आहेत, काय खबरदारी घेतली जात आहे. याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज, शुक्रवारी विधानभवन परिसरात महत्वाची माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत करोनासंदर्भात आढावा घेत असताना राज्यातील सद्यपरिस्थितीची माहिती देण्यात आली. ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात आता जगात एक नवीन विषाणूचा प्रकार आल्याची माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, ‘राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि तसा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य तिसरी लाट ही जानेवारी ते मे पर्यंत येऊ शकते.’ पश्चिम बंगाल, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती, असेही ते म्हणाले.
निवडणुका पुढे ढकलण्याच्या नावाखाली ज्या पाच राज्यांत निवडणुका आहेत, तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करून पंजाबमध्ये सत्ता ताब्यात घेणे त्यांना शक्य होऊ शकते. निवडणुका पुढे ढकलणे हे वेगळे संकट देशात निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित ‘डोर टू डोर’ प्रचारासह करोना संबंधिचे नियम पाळून निवडणुका होऊ शकतात. यावर केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.