हायलाइट्स:
- थर्टी फर्स्ट, न्यू इअर सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर
- कल्याण-डोंबिवलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात
- पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची माहिती
- हॉटेल्स, रिसॉर्टवरील पार्ट्यांवर राहणार लक्ष
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण-डोंबिवलीतील पोलीसही सज्ज झाले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याण परिमंडळ तीनमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व महिला पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून सर्व ठिकाणी तपासणी केली जाईल. तसेच प्रामुख्याने शांतता समिती व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून बैठका घेण्यात आल्या आहेत. करोना नियमांचे पालन करून ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताचा जल्लोष शांततेच्या मार्गाने कसा साजरा करता येईल, याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले.
हॉटेल, रिसॉर्टवर राहणार लक्ष
हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले असल्यास त्याठिकाणी केडीएमसी अधिकारी यांच्यासोबत एक पथक तयार करून करोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे स्मार्टसिटी अंतर्गत केडीएमसीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशनचे व्हिडिओ कॅमेरे आणि काही ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे ड्रोनचा वापर करून चालणाऱ्या पार्ट्या आणि सेलिब्रेशन यावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले.