हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या यांनी नुकतीच दापोलीत जाऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात तक्रार दाखल केली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले

मुंबई : अवैध रिसॉर्ट बांधकामप्रकरणी महाविकासआघाडीचे मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी आता भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (किरीट सोमय्या) यांनी आपण येत्या महिनाभरात अनिल परब (Anil Parab) यांचा राजीनामा द्यायला लावणार असल्याचा दावा केला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुरुड येथील अवैध रिसॉर्ट हे अवैध असल्याचा निर्वाळा राज्याच्या पर्यावरण खात्याने दिला आहे. त्यानंतर हे रिसॉर्ट तोडण्यासठी १७ डिसेंबरला नोटीस पाठवण्यात आली होती. येत्या ३ जानेवारीपर्यंत या नोटीसवर उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे येत्या ५ ते ७ जानेवारीपर्यंत राज्य सरकार मुरुड येथील अवैध रिसॉर्ट तोडण्याचा आदेश जारी करेल. हा आदेश आल्यानंतर मी तात्काळ राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे. मंत्री अनिल परब यांनी अवैधरित्या हे रिसॉर्ट बांधले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी याचिका करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पर्यावरण मंत्रालयानेच हे रिसॉर्ट अवैध ठरवल्याने कारवाई अटळ आहे. त्यामुळे अशाप्रकारे अवैध काम करणाऱ्या व्यक्तीचे मंत्रीपद आणि आमदारकी काढून घेतली पाहिजे, हे मी राज्यपालांना सांगणार आहे. सध्या ठाकरे सरकारमधील १८ नेते आणि मंत्र्यांची चौकशी सुरु आहे. प्रत्येक महिन्याला एक घोटाळा मी बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे व शरद पवारांवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले…
किरीट सोमय्या यांनी नुकतीच दापोलीत जाऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात तक्रार दाखल केली होती. रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात परब यांचे रिसॉर्ट असून त्याचे सगळे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. कारवाई सुरु झाली असली तरी फौजदारी दाखल करावीच लागेल. ठाकरे सरकारच्या काळातच कारवाई सुरु झाली आहे. मात्र, हे सरकार अनिल परब यांना पाठीशी घालू शकणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. किरीट सोमय्या हे भाजपसोबत ‘ईडी’चेही प्रवक्ते आहेत. कारण पिक्चर कितीही चांगला असला तरी त्यामध्ये आयटम साँग लागतंच, अशी खोचक टिप्पणी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. या टीकेला किरीट सोमय्या यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. मी लवकरच रोहित पवार यांचाही हिशेब करेन. तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here