हायलाइट्स:
- मुक्ताईनगर तालुक्यात महाविकास आघाडीत वाद पेटला
- एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक आमने-सामने
- सोशल मीडियावरील पोस्टमुळे झाला वाद
मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर केल्याचा राग आल्याने शुक्रवारी रात्री ईश्वर हटकर याने घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. तसंच पीडितेचा हात धरला आणि आम्ही आमदार चंद्रकांत पाटील यांची माणसे आहोत, असं ते म्हटल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यावेळी तेथे आलेले शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील यांनी एकनाथ खडसे यांना शिवीगाळ करून ईडीचे २ कोटी रुपये कुठे गेले? असं वक्तव्य केल्याचाही आरोप आहे. यावेळी पीडितेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अॅड.रोहिणी खडसे यांना फोन केला. काही वेळाने त्यांच्यासह दोघे आल्याने सुनील पाटील आणि ईश्वर हटकर हे नरमले.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोलीस अधिकारी प्रदीप शेवाळे करत आहेत. या प्रकारावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला असून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा तसंच जशाच तसे उत्तर देत चोप देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अवैध धंदे असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असा कुठलाही प्रकार नसल्याचं उत्तर दिलं होतं. आता रोहिणी खडसेंच्या आमदाराला चोप देण्याच्या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा राजकीय गोटात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे.