हायलाइट्स:
- ठाण्यातील कळवा परिसरात धक्कादायक घटना
- पाच महिन्याच्या मुलाचा मृतदेह पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये आढळला
- कळवा पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल
- संशयितांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू
कळव्यातील सायबानगरमध्ये राहणारा हा चिमुरडा शुक्रवारी दुपारी घरातून अचानक गायब झाला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळवा पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरू केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना, शनिवारी सकाळी या मुलाचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीतील एका घराबाहेरील पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला. नेमका मुलाचा मृत्यू कसा झाला?, ही हत्या आहे की आणखी काय प्रकार आहे? याविषयी कळवा पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील एका घरासमोरील पाण्याच्या ड्रममध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला. पाण्यात बुडून या मुलाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. याच परिसरातील काही जणांना अपहरण आणि हत्या केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.