हायलाइट्स:
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला
- माझ्यावर हल्ला घडवून हत्येचा कट आखल्याचा दावा
- जयंत पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
- जयंत पाटील आणि पोलीस अधिकारी कटात सामील असल्याचा दावा
गोपीचंद पडळकर यांनी हा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ७ नोव्हेंबर रोजीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा हल्ला आटपाडी पोलीस चौकीच्या समोर घडवून आणल्याचा दावा त्यांचा आहे. हा हल्ला सुनियोजित होता, असंही त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ प्रसिद्ध करून पडळकर म्हणाले की, माझी कार ज्या दिशेने येत होती, त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या कारवर दगड फेकायचे, मग माझ्या कारचा वेग कमी होताच, भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडून हल्ला करायचा, असा सुनियोजित कट होता, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी पडळकर यांनी पोलिसांवरही आरोप केला आहे. या सर्व हल्ल्याचे चित्रीकरण करताना पोलीस या व्हिडिओत दिसत आहेत. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय, असेही पडळकर यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांसह पालकमंत्री जयंत पाटीलही या कटात सामील असल्याचा आरोप
या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे पोलीस अधिकारी एस. पी दिक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील सामील आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केले आहे. उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांवरील विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकांमध्ये सामील असतील तर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी पवार-पाटील यांच्याविरूद्धचा लढा सुरूच ठेवणार आहे, असंही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
गोपीचंद पडळकर यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. तसेच हा पडळकर यांचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले.