हायलाइट्स:
- प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही – कवाडे
- प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नाहीत: प्रा. जोगेंद्र कवाडे
- आरक्षणाच्या मुद्द्यावरही कवाडे यांनी केले भाष्य
कल्याण येथील शासकीय निवासस्थानी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्रित येऊन निवडणुका लढल्या पाहिजेत. आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, असे कवाडे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे की नाही? असा प्रश्न कवाडे यांना विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडेकर हे स्वत:ला रिपब्लिकन मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लिकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. रामदास आठवले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांसोबत आमची ऐक्याची चर्चा सुरू आहे, असे कवाडे यांनी सांगितले.
जोगेंद्र कवाडे यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या पक्षाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागितला आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या कामासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. येत्या तीन महिन्यांत हा डाटा गोळा करून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रश्न सूटू शकतो, असे ते म्हणाले. सध्याच्या घडीला राजकारणी एकमेकांवर टीका करत आहेत, त्यावर कवाडे यांची प्रतिक्रिया दिली. राजकारणात शत्रुत्व निर्माण होणार नाही. अनेक प्रकारचे विरोध सहन करून आमचा पक्ष काम करीत आहे. काल-परवा म्यॉव म्यॉव झाले, पंतप्रधानांवर टीका केली गेली. टीका करण्याची पण एक पातळी असते, ती पातळी ढासळू नये. असभ्यतेने वागून राजकीय टीका नको, असा सल्ला कवाडे यांनी यावेळी दिला.