स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वेमार्गावर पोहचली. याचवेळी तिला वाचविण्यासाठी तिच्या पाठोपाठ तिचे वडील आणि नवराही धावून आला. या दोघांनाही ही महिला जवळ येऊ देत नव्हती. ही घटना पाहिल्यानंतर देवानगरी भागातील मेट्रो औरंगाबाद असोसिएशनचे श्रमंत गोर्डे पाटील व त्यांच्यासोबत अन्य काही जणांनी रेल्वेमार्गाकडे धाव घेतली. तर याचवेळी नेत्रा जोशी आणि मीनाक्षी सोनवणे या महिलांनी आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेशी बोलत तिचं मन परिवर्तन करून तिला बाजूला आणले आणि काही मिनिटांनंतर तेथून रेल्वे निघून गेली.
तिची चौकशी केली असता, ती स्वयंपाक आणि धुणी-भांड्याची कामे करते. तिने काही जणांकडून उसने पैसे घेऊन भावाला ४० हजार आणि नवऱ्याला १५ हजार रुपये दिले होते. मात्र, दोघांनीही पैसे परत न केल्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनी तिची समजूत काढली. तसेच, पैसे परत करण्याची हमी नवरा आणि वडिलांनी दिली. त्यानंतर ती महिला घरी निघून गेली.
दोन दिवसांपासून घरात वाद
महिलेने दिलेले पैसे भावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी हा विषय महिलेच्या वडीलांसमोर आला. शेअर मार्केट पडल्यामुळे तोट्यात आल्याचेही भावाने सांगितले. यानंतर पैशावरून घरात वाद सुरू होता. जीव देण्याची धमकी महिलेने दिल्याने, नवरा व वडील दोन दिवसांपासून घरातच होते. शनिवारी तिने पाच आणि दोन वर्षांच्या दोन्ही मुलांना घरी सोडले. जीव देण्यासाठी रेल्वे रूळाकडे निघाली होती. मात्र स्थानिकांनी पुढाकार घेतल्याने मोठा अनर्थ टळला.