हायलाइट्स:
- कर्वेनगर परिसरात खळबळ
- तलवारीने वार करून तरुणाचा खून
- पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
अनिल जाधव हा याला दोन बहिणी असून एक कर्वेनगर येथे राहते, तर दुसरी डहाणूकर कॉलनी परिसरात राहते. अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. तो त्याच्या बहिणीला लक्ष्मीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला होता. बहिणीला सोडून जात असताना ताथवडे उद्यान परिसरातील देवेश चितळे दुकानाजवळ दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी अनिल याला अडवलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले.
या हल्ल्यात अनिल हा गंभीर जखमी झाला. हल्ला झालेला परिसर हा उच्चभ्रू असून या ठिकाणी वर्दळ असते. अनिल हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अलंकार व गुन्हे शाखेचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात अनिल याचा मृत्यू झाला असून घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती.
दरम्यान, अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. त्याच्या अगोदरच त्याचा खून झाल्याने जाधव कुटुंब हादरून गेलं आहे. या तरुणाच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.