ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra weather forecast)२६ डिसेंबरपासून वायव्य भारतावर व २७ डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा व विदर्भाला यलो अलर्ट
हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात २८ आणि २९ डिसेंबरला पावसाची शक्यता असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यानुसार हवामान विभागानं मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत २९ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.