हायलाइट्स:
- या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप असणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्या अटकेची शक्यता वर्तविली जात आहे.
- नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे
नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना कारवाईविषयी आश्वस्त केले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस अधीक्षक स्वत: याप्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे आता राणे कुटुंबीय काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.