हायलाइट्स:
- जिल्ह्यात संपकरी बस कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई
- कामावर रुजू होत नसल्याने विभाग नियंत्रकांनी केली कारवाई
- संपावर तोडगा निघणार कधी?
राज्यभरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मागण्यांवर ठाम आहे. बस कामगार कामावर रुजू होत नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगारात कारवाईच्या इशार्यानंतर ३५ चालक आणि ३५ वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे तीन ते चार मुख्य मार्गावर बसेसवा सुरू आहे. नोटीस देऊनही कामावर रुजू न झाल्याने जळगाव विभागात एकूण ३५० कर्मचार्यांवर आतापर्यंत निलंबनांची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर बस कर्मचार्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र कर्मचारी तारखा मागत आहेत. सदरच्या कर्मचार्यांवर कामावर रूजू होण्याबाबत जळगाव विभाग नियंत्रकांतर्फे अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने जळगाव आगारातील ८ व भुसावळ आगारातील १४ अशा एकूण २२ कर्मचार्यांवर सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बडतर्फीची कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्यांमध्ये ११ वाहक तर ११ चालक असल्याची माहिती भगवान जगनोर यांनी दिली आहे.
दरम्यान, शासनाकडून बस कर्मचार्यांना कामावर रूजू होण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आल्यानंतरही कर्मचारी रूजू होत नसल्याने आता विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकीकडे शासनाकडून मागण्यांवर विविध प्रकारे तोडगा काढला जात आहे, तर दुसरीकडे बस कर्मचारी विलिनीकरणावरच ठाम आहे. त्यामुळे या संपावर अंतिम तोडगा कधी निघणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.