हायलाइट्स:

  • हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक
  • नेत्यांनी केली जोरदार टीका
  • आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिवसेनेने एवढं झोळी भरून दिलं की, घेताना त्यांची झोळीही फाटली, आता तर ते आमचा हातही मागत आहेत,’ असा टोला शिवसेना नेते आणि खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी लगावला. राज्यात हातात हात घालून काम करणाऱ्या दोन्ही काँग्रेसवर सेनेने केलेल्या या टीकेमुळे जिल्ह्यात आघाडीतील धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. (Hasan Mushrif Latest News)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेत महाविकास आघाडी पॅनेलची घोषणा केली आहे. या विरोधात शिवसेनेने शेकाप आणि आरपीआयला सोबत घेत विरोधी पॅनेलची घोषणा केली. या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी राधानगरी तालुक्यातील तुंरबे येथे झाला. यावेळी प्रा. मंडलिक यांच्यासह शिवसेना नेत्यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली.

हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि तलवारी; एकनाथ खडसेंनी दिली खळबळजनक माहिती!

प्रा. मंडलिक म्हणाले की, दोन वर्षात शिवसेनेला आम्ही भरपूर दिलं असं मुश्रीफ सांगत आहेत. पण शिवसेनेने त्यांना झोळी भरून दिलं आहे. आता तर ते आमचे हातही मागत आहेत. शिवसेनेला बाजूला ठेवून त्यांनी भाजपला जवळ केलं, मग आम्ही त्यांच्यासोबत कसं जाणार, असा सवालही त्यांनी केला. जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघात शिवसेनेला सोबत घेतलं, मग आता आम्हाला बाजूला ठेवलं. वापरून घेण्याची ही मुश्रीफ यांची पद्धत चुकीची असल्याचा आरोप आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. जिल्हा बँकेत मुश्रीफ यांनी आपली जागा बिनविरोध करून घेतली, त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील शाहू कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यास मदत केली. हा तर पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला.

दरम्यान, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित होते. सर्वच नेत्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघात मुश्रीफ यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांनी जिल्हा बँकेच्या प्रचारात मात्र जोरदार टीका सुरू केल्याने महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here