हायलाइट्स:

  • कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही
  • जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता

कणकवली: विधिमंडळाच्या आवारात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवणारे भाजप आमदार नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तुम्ही मतदारांच्या पाठिंब्याने सभागृहात निवडून आला आहात, तुम्ही कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनधी नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. सभागृहात अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर नारायण राणे यांना पत्रकारपरिषद सुरु असताना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर नारायण राणे प्रचंड संतापले. कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही. जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता, असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला. सध्याच्या घडीला नितेश राणे हे विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट काम करणारा आमदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात नितेश राणे यांच्यासमोर येऊन बोलण्याची कोणाचीही ताकद नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
तुम्हाला मतदारांनी निवडून दिलंय, तुम्ही कुत्रे, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनिधी नव्हे: अजित पवार
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांच्यासह अनेक बडे पोलीस अधिकारी सिंधुदुर्गात ठाण मांडून बसले आहेत. नितेश राणे हे काय अतिरेकी आहेत का? एका आमदारासाठी इतकी यंत्रणा कामाला कशी लावली जाते? एखाद्याला फक्त मारहाण झाली किंवा खरचटलं असताना एवढी पोलीस यंत्रणा कामाला का लागली आहे? ३०७ कलम लावायला एखाद्याचा खून झाला आहे का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

नितेश राणेंना जामीन की अटक?

संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर मंगळवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी २.४५ वाजता या जामीन अर्जावर सुनावणी होईल. अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांच्यातर्फे वकिलांची फौज न्यायालयात उभी राहणार आहे. अ‍ॅडव्होकेट संग्राम देसाई नितेश राणे यांच्यासाठी युक्तिवाद करतील. तर अ‍ॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत हे वकील त्यांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असतील. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅडव्होकेट प्रदीप घरत आणि अ‍ॅडव्होकेट भूषण साळवी युक्तिवाद करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here