हायलाइट्स:
- अनेक नगरपालिकांच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपली
- ४१ नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती
- कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा समावेश
कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ४१ नगरपालिकांच्या सध्याच्या सभागृहाची मुदत २९ डिसेंबर ते १७ फेब्रुवारी या दरम्यान संपणार आहे. करोना संसर्गामुळे या नगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर किमान सहा महिने निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. कारण हा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याची विनंती सरकार निवडणूक आयोगाकडे करणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या सर्व नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ पालिकांची मुदत दोन दिवसात संपणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा, गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव, कुरूंदवाड व मलकापूर या पालिकांवर गुरूवारपासून प्रशासकराज येणार आहे.