लोणावळ्यातील कुमारचौक, रायवूड कॉर्नर, भांगरवाडी याठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. ब्रीद अॅनालाइझर मशिनद्वारे मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक व बंगलेधारकांनी येणार्या पर्यटकांची ओळखपत्रे व नोंदी करुन घ्याव्यात तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावून घ्यावेत, अशा सूचना पोलीस प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना दिल्या आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजेपर्यंतच मर्यादित आवाजाच्या क्षमतेनुसार वाद्यांना परवानगी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
रात्री सातनंतर भुशी डॅम, टायगर, लायन्स व राजमाची पॉईंटस, तसंच गडकिल्ले अशा पर्यटनस्थळांवर बंदी असल्याने कोणीही धोकादायकपणे त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न करु नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही असे वर्तन करु नये. शहरातील वातावरणाचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत हे उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात करावे, नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करून धांगडधिंगा, हुल्लडबाजी केल्यास व मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास संबंधितांच्या नववर्षाची सुरुवात ही पोलिस कोठडीतच होईल, असा इशाराच लोणावळा पोलिसांनी दिला आहे.