मुंबई: राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

वर्षा निवासस्थानी करोना उपाययोजनांसंदर्भात आज मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना आरोग्याची काळजी घेऊन जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळायच्या आहेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तू मिळणार की नाहीत, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळेच काहीही झाले तरी जीवनावश्यक वस्तूंची विक्री बंद केली जाणार नाही, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. तरीही नागरिक ऐकायला तयार नाहीत. त्यातूनच किराणा सामान खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये दररोज मोठी गर्दी होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही गर्दी कायम राहिल्यास हा आजार आणखी भीषण रूप धारण करू शकतो, ही बाब लक्षात घेऊनच राज्य सरकारने अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही सर्वच दुकाने २४ तास खुली ठेवण्याची परवानगी आज राज्य सरकारने दिली आहे. हा सर्वांसाठीच मोठा दिलासा मानला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here