हायलाइट्स:
- भुसावळात विवाहितेचा निर्घृण खून
- पोलिस चौकी मागील जंगलात आढळला मृतदेह
- घटनेनं शहरात उडाली खळबळ
वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलीस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जन जागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास शहर पोलिसांना समजल्यानंतर पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा. निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा. निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली.
भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. महिला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनांचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शहरातील ३२ वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.