हायलाइट्स:
- संजय राऊत यांचा आक्रमक इशारा
- माहिती लपवली तर राणेंवरही गुन्हा दाखल होणार
- नाशिकमध्ये राऊत यांनी दिले संकेत
‘हत्येच्या प्रयत्नातील हव्या असणाऱ्या आरोपीला पोलीस शोधत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री म्हणत आहेत की मला माहीत आहे पण सांगणार नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात, पोलिसांना सहकार्य करा. कायद्यापासून महत्वाची माहिती लपवू नका. आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचं आहे. अन्यथा आरोपींना पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असं संजय राऊत यांनी नारायण राणे यांना उद्देशून म्हटलं आहे.
फडणवीसांच्या आरोपांना उत्तर
नितेश राणेंबाबत महाविकास आघाडी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘राजकीय सुडापोटी आमच्यावर काय करावाई झाली याचा मी एक साक्षीदार आहे. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरपावर करून महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे.’
दरम्यान, नितेश राणे यांना राजाश्रय दिला जात असल्याने ते पोलिसांना सापडत नसल्याचं सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी ही राजकीय लढाई आणखीनच आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.