राजकीय नेत्यांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावल्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात या लग्नसोहळ्याची एक झलक

ठाकरे -पाटील कुटुंब एकत्र

भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांचा विवाह समारंभ मुंबईतील पंचतारांकीत ताज पॅलेस हॉटेलमध्ये नुकताच संपन्न झाला. निहार याचे वडील बिंदुमाधव यांचं १९९६ साली अपघाती निधन झालं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार याचे सख्खे काका आहेत. हर्षवर्धन पाटील हे १९९५ ते २०१४ असे सलग १९ वर्ष राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री होते. तर अंकिता पाटील यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण घेतले असून सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. नवदांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सिनेमा, नाटक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

जयंत पाटील यांच्या मुलाचा विवाह

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जंलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा राजवर्धन पाटील याचा रिया दोशी हिच्यासोबत नुकताच मुंबईत विवाह सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभा पवार यांनी या सोहळ्याला हजेरी लावून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. कोविड निर्बंधांमुळे अत्यंत निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. राजवर्धन याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉरविक विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. राजाराम कन्झ्युमर केअर कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच आमदारांनी या लग्नात हजेरी लावली होती.

सुप्रिया सुयेंची विशेष उपस्थिती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांचा मुलगा प्रकेत आर्य याचा विवाह समारंभ नुकताच दिल्लीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फ्रंसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते. डॉ. २०१४ साली सत्यपाल सिंह यांनी भारतीय पोलिस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील बागपत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व खासदार म्हणून निवडून आले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते २०१७- २०१९ दरम्यान मनुष्य बळ विकास खात्याचे राज्यमंत्री होते.

धनंजय दातार यांच्या मुलाचा लग्नसोहळा

दुबईस्थित अल अदील समूहाचे अध्यक्ष धनंजय दातार यांचा मुलगा हृषिकेश दातार याचा विवाह पुण्यातील उद्योजक समीर लडकत यांची कन्या आकांक्षा हिच्याशी नुकताच संपन्न झाला. कोरेगाव पार्क भागात पार पडलेल्या या विवाह समारंभाला राजकीय तसेच उद्योग क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी आमदार धनंजय माने पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here