हायलाइट्स:

  • ‘राजकारण्यांनी एकत्र येऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा’
  • संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन
  • देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही केलं भाष्य

जळगाव : चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्याला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती हेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना संभाजीराजेंनी केलेल्या एका वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे. (संभाजीराजे छत्रपती चालू Devendra Fadanvis)

‘देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे,’ असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Omicron Variant : ओमिक्रॉनचा राज्यातील आणखी एका शहरात शिरकाव; प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

आरक्षणाबाबत केलं आवाहन

या सोहळ्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय राजकारण्यांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. ‘शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. पण सध्या महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व इतर आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्‍नांमुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. राजकारण-राजकारणाच्या ठिकाणी, पण आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे,’ असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावककारे, चंदूभाई पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंदभाई पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here