एसटी नुकसानाला कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. इमामवाडा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अनधिकृत नियमबाह्य कामबंद आंदोलन केले. ७ ते २६ डिसेंबरदरम्यान ३०६३ फेऱ्या आणि ३,९२,२२२ किमी रद्द होऊन महामंडळाचे १,५८,२६,४६९ रुपयांचे नुकसान झाले. आपण या आंदोलनात पुढाकार घेत अन्य कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली. नुकसानीला आपण जबाबदार आहात, असा मजकूर वाहक ईश्वर बालपांडे यांना महामंडळाने दिलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.
औरंगाबाद आगारातील वाहक उल्हास चव्हाण यांना मिळालेल्या आरोपपत्रात, ‘आगाराचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्याला आपण जबाबदार आहात,’ असे स्पष्ट करण्यात आले. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या पगारातून नुकसानभरपाई वसूल केली जाते. संपकरी कर्मचाऱ्यांना आरोपपत्रावर आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.