म. टा. वृत्तसेवा, यवतमाळः आर्णी तालुक्यातील कुऱ्हा-डुमनी येथील मानवी चोले या तीन वर्षांच्या मुलीच्या खूनप्रकरणात अटकेत असलेल्या काकू दिपाली चोले हिची पोलिस कोठडी आज, गुरुवारी संपणार आहे. मात्र खुनाची कबुली देणाऱ्या दिपालीले हे का केले, याविषयीचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. अनेकानेक कारणे तिच्याकडून सांगण्यात येत असल्याने पोलिस अधिकारी गोधळून गेले आहेत.

मानवी ही २० डिसेंबर रोजी घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आर्णी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या तीन पथकाचे २५ जण दिवस-रात्र मानवीच्या शोधात होते. २७ डिसेंबरला रात्री मानवीचा मृतदेह गावातच सापडला. पोलिसांनी मानवीच्या घरासमोर राहत असलेले तिचे काका गोपाळ व काकू दिपाली चोले यांना ताब्यात घेतले. चौकशीत गोपालचा सहभाग नसल्याचे आढळून आल्यावर त्याला सोडण्यात आले. दिपाली हिच्यावर भादंविच्या ३०२ कलमांखाली गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली. मात्र तिने खून कसा केला याबद्दल वेगवेगळे सांगत पोलिसांची दिशाभूल सुरू केली. शेवटी तिने पोलिसांसमोर खून कसा केला याची कबुली दिली. घरासमोर खेळत असलेल्या मानवीला खायला देते म्हणून घरात नेले. बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केले. मृतदेह स्वयंपाकघरातील गव्हाच्या कोठीत दडविला. सात दिवस मानवीचा मृतदेह या कोठीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here