भारताच्या ‘राफेल‘चा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय. इम्रान खान सरकारनं आपल्याच खासदारांचा विरोध बाजुला सारत चीनकडून ‘J 10 C‘ श्रेणीची तब्बल २५ लढावू विमानांच्या एका संपूर्ण स्क्वॉड्रनची खरेदी केलीय.
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली. पाकिस्तान – चीन दरम्यान झालेल्या विमान खरेदी कराराद्वारे, जे-१० सी (J-10C) चं एक स्क्वॉड्रन पुढच्या वर्षी २३ मार्च रोजी पाकिस्तान दिनाच्या उत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे.
जे-१० सी विमान हे जगातील सर्वोत्कृष्ट लढावू विमानांपैकी एक असल्याचा चीनचा दावा आहे. मात्र, या विमान खरेदी सौद्याला विरोध असणाऱ्या पाकिस्तानच्या एका खासदारानंच या विमानाच्या क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. चीनच्या दबावाखाली येऊन पाकिस्तान सरकारनं या कराराला मंजुरी दिल्याची टीकाही केली जातेय.
जे-१० सी विमानाची वैशिष्ट्यं
चिनाचान J-10C लढावू विमान हरएक प्रकारच्या हवामानात उड्डाण करण्यास सक्षम मानलं जातं. चीननं २००६ मध्ये या लढावू विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला होता. गेल्या काही वर्षांत सिंगल इंजिन असलेलं हे विमान चीनच्या हवाई दलाचा कणा ठरलंय.
या विमानाचं वजन १८-२० टन आहे. एकावेळी हे विमान ६.५ टन पेलोड आपल्यासोबत वाहून नेऊ शकतं. यामध्ये पीएल-१५ मिसाईल जोडलेली आहे, जी २०० किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. याशिवाय या विमानाद्वारे हवेतून जमिनीवर बॉम्बहल्ला करता येणं शक्य आहे.
जपानच्या संरक्षण मंत्रालयानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, चीन सध्या ४६८ ‘जे १०-सी’ विमानांचा वापर करत आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचं हे विमान अमेरिकेच्या एफ-१६ (F-16) विमानासारखंच आहे. पाकिस्तानकडे अगोदरपासूनच अमेरिकन बनावटीची एफ -१६ श्रेणीची लढावू विमानं आहेत.