हायलाइट्स:
- राज्यातील सत्तास्थापनेबाबत शरद पवारांचा दावा
- चंद्रकांत पाटलांनी दिलं प्रत्युत्तर
- शरद पवारांचा इतिहास खोटं बोलण्याचा असल्याची केली टीका
‘शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोघेही मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्याइतका मी मोठा नाही. मात्र पवारांचा इतिहास खोटं बोलण्याचा आहे आणि पत्रकार यावर पुस्तक लिहू शकतात,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
माझं एक वक्तव्य शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढवण्यास कारणीभूत ठरलं, असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, ‘भाजप व शिवसेनेतील अंतर वाढवण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केले. ते त्यांना लखलाभ.’
‘भाजपसोबत येण्यासाठी अनेक पक्ष इच्छुक’
‘महाविकास आघाडीतून पहिल्यांदा कोणी बाहेर पडायचे आणि भाजपसोबत सत्तेवर कोणी यायचे याची चढाओढ सुरू आहे. गेल्या दोन दिवसातील घटनाक्रम याला पूरक आहे,’ असा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी भविष्यातील राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीतील एक मोठा नेता प्रचारासाठी उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. यामागे महाविकास आघाडीचा वैयक्तिक स्वार्थ आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.