सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. यादरम्यान महाविकासआघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. पहिला धक्का म्हणजे संतोष परब हल्लाप्रकरणात आरोपी असलेले भाजपचे वेंगुर्ला तालुका प्रमख मनिष दळवी यांचा विजय झाला आहे. सत्र न्यायालयाने गुरुवारी दळवी यांना मतदानाचा हक्क नाकारला होता. तर दुसरीकडे जिल्हा बँकेचे शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचाही पराभव झाला आहे. कणकवलीमध्ये सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात लढत झाली होती. मतमोजणीदरम्यान सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीच्या सहाय्याने निकाल लावण्यात आला. यामध्ये विठ्ठल देसाई यांचा विजय झाला.

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर कणकवलीत राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. सतीश सावंत यांनी राणे साहेबांशी गद्दारी केली होती. त्यामुळे देवही त्यांच्या बाजूने नव्हता. परमेश्वराची चिठ्ठही राणे साहेबांच्या बाजूने पडली, अशी बोलकी प्रतिक्रिया एका राणे समर्थकाने दिली. आता सतीश सावंत यांनी घरी बसावे. राणे साहेबांचा नाद करायचा नाय, नितेश राणे बस नाम ही काफी है, अशा घोषणा यावेळी राणे समर्थकांकडून देण्यात आल्या.
LIVE: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंची सरशी, समर्थकांच्या आनंदाला उधाण
जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ जणांनी मतदान केले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोट्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती. मतदानावेळी केंद्रावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे कणकवलीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर यामध्ये नारायण राणे यांच्या गटाची सरशी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here