येणाऱ्या काही आठवड्यांत रशियाचं एक गुप्तचर लष्करी उपग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झालीय. रशियानं नुकतंच या उपग्रहाचं प्रक्षेपण ‘यशस्वी’ झाल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, या उपग्रहात काहीतरी गडबड झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या सोमवारी रशियानं आपल्या नव्या पिढीच्या महाकाय स्पेस रॉकेट अंगारा A-5 च्या मदतीनं एक गुप्तचर उपग्रह अवकाशात धाडला होता. या लष्करी उपग्रहाचं वजन जवळपास २० टन असल्याचं समजतंय.
बिघाडानंतर हा गुप्तचर उपग्रह तसंच त्याचं बूस्टर रॉकेट येत्या काही आठवड्यांत पृथ्वीवर धडकू शकतं, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
रशियाचे ‘अंगारा ए-5’ हे रॉकेट गुप्तचर उपग्रह, शस्त्रं आणि नेव्हिगेशनसाठी आवश्यक उपग्रह अवकाशात पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. इतकंच नाही तर या अवजड रॉकेटच्या मदतीनं रशिया आपली चंद्र मोहीमेचेही स्वप्न पाहत आहे.
काय बिघडलं नेमकं? कुठे झाली चूक?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला होता. परंतु रॉकेटच्या वरच्या भागावर बसवलेला ‘बूस्टर पर्सेई’ उड्डाणा दरम्यान निकामी ठरले. यामुळे रशियन उपग्रह आपल्या पूर्वनिश्चित योग्य कक्षेत पोहोचू शकलेला नाही. हा अनियंत्रित उपग्रह आणि त्यात बसवलेले बूस्टर सुमारे २० टन वजनाचे आहेत. येत्या काही आठवड्यांत ते पृथ्वीलाही धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रशियन मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पर्सेईला आपल्या चाचणी मोहिमेदरम्यान पाच इंजिन सुरू करण्याची आवश्यकता होती, परंतु दुसऱ्या इंजिनात बिघाड झाला. परिणामी हा रशियन उपग्रह अजूनही खालच्याच कक्षेत आहे. पृथ्वीवर कोसळण्यापूर्वी हा उपग्रह अनेक आठवडे इथेच राहू शकतो. हा उपग्रह समुद्रसपाटीपासून २२,२३६ मैल उंचीवर पोहोचणं अपेक्षित होतं. गेल्या तीन वर्षांत रशियन अंतराळ संस्थेसाठी हा पहिलाच मोठा अपघात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
उल्लेखनीय म्हणजे, स्वतंत्र तज्ज्ञांच्या या दाव्यावर रशियन लष्कराच्या हायकमांडकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.