हायलाइट्स:
- या संपूर्ण पत्रकारपरिषदेत नारायण राणे हे नितेश राणे यांच्याविषयी फार जपून बोलताना दिसत होते
- गेल्या पत्रकारपरिषदेतील त्यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करुन जिंकण्याचा प्रयत्न झाला. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर चार-चार दिवस सुनावणी चालते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सिंधुदुर्गात ठाण मांडून बसतात. पण मी इतकी वर्षे सगळ्यांना पुरुन उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे मला असल्या चौकश्यांनी फरक पडत नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.
या संपूर्ण पत्रकारपरिषदेत नारायण राणे हे नितेश राणे यांच्याविषयी फार जपून बोलताना दिसत होते. कारण, गेल्या पत्रकारपरिषदेतील त्यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. यावेळी एका पत्रकाराने नितेश राणे यांचे ‘प्रकरण’ असा उल्लेख करताच राणे काहीसे संतापले. ‘डोंट से लाईक धिस’, अशी समज त्यांनी पत्रकाराला दिली.
आता पुढचं लक्ष्य महाराष्ट्राची सत्ता: नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नाही, तर तो भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली. हा विजय प्रचंड असा आहे. आता आमचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्राची सत्ता मिळवणे, हेच असेल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.आगामी काळात कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये विधानसभेत आणि लोकसभेत भाजपचाचा विजय होईल. सिंधुदुर्गाचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल. वर्षानुवर्षे असलेल्या आणि नको झालेल्या चेहऱ्यांना जनता घरी पाठवेल. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्याची आणि सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.