नागपूर: करोनाबाबत जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळ देण्यासाठी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी खासदार निधीतून ५० लाख रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट, आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणारे गणवेश, मास्क, सेनिटायझर्स आदी वस्तू खरेदीसाठी हा निधी दिला आहे. याबाबत डॉ. महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आवश्यक सूचनाही केल्या.

संसदेच्या अधिवेशनानंतर दिल्लीहून नागपूरला परतताच डॉ. महात्मे यांनी करोनावर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ‘अॅक्शन प्लान’ तयार केला. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत मेडिकल आणि मेयोला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील चर्चा केली. ‘लॉकडाऊन’मध्ये नागरिकांनी सरकारी सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. विकास महात्मे यांनी केले.

करोना महामारी रोखण्यासाठी संपूर्ण देशाने एकवटून पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार डॉ. महात्मे यांनी सर्वांना केले. आपल्याला या साथीवर मात करता येईल. संकटाच्या या घडीला केंद्र व राज्य सरकार पीडितांवर योग्य उपचार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांनाही जागरूक करण्याची गरज आहे. सामान्य लोकांनी घरात राहण्याची गरज समजून घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये. या साथीने गरीब-श्रीमंत सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग हाच एक मार्ग संयुक्तिक वाटतो, असे महात्मे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here