हायलाइट्स:
- अफगाणिस्तानला मानवी दृष्टिकोनातून मदत
- गहू पाठविण्याच्या प्रस्तावावर भारत आणि पाकिस्तानमधील करार अंतिम टप्प्यात
- भारत ५० हजार टन गहू अफगाणिस्तानला पाकिस्तानातून रस्तामार्गे पाठविणार
तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या अफगाणिस्तानला मानवी दृष्टिकोनातून मदत म्हणून गहू पाठविण्याच्या प्रस्तावावर भारत आणि पाकिस्तानमधील करार अंतिम टप्प्यात आहे, असे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे. भारत ५० हजार टन गहू अफगाणिस्तानला पाकिस्तानातून रस्तामार्गे पाठविणार आहे.
हा गहू वाहतूक करणारे अफगाण कंत्राटदार आणि ट्रकचालक यांची यादी भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केली आहे. हा गहू पाठविण्याबाबतची कार्यपद्धती भारत आणि पाकिस्तानने निश्चित केली आहे. कंत्राटदार आणि ट्रकचालकांच्या यादीला पाकिस्तानने मान्यता दिल्यानंतर गव्हाची प्रत्यक्ष वाहतूक सुरू होऊ शकेल, असे वृत्त ‘एक्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिले आहे.
अफगाणिस्तानला मानवी दृष्टिकोनातून ५० हजार टन गहू वाघा सीमामार्गे पाठविण्याची घोषणा भारताने ऑक्टोबरमध्ये केली होती. सध्या पाकिस्तान फक्त अफगाणिस्तानातून भारताला निर्यात करण्याची परवानगी देतो. उलटमार्गे निर्यातीस मात्र परवानगी नाही. अफगाणिस्तान मंत्रीस्तरीय समन्वय कक्षाची स्थापना गेल्या महिन्यात झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अपवाद म्हणून भारतालाही अफगाणिस्तानला रस्तामार्गे गहू पाठविण्याची परवानगी दिली. हा निर्णय मानवी दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आला आहे. तो भविष्यात लागू होईलच, असे नाही, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान भारतातून गहू पाठविण्यासाठी राजी नव्हता. भारतीय बॅनरखाली गहू पाठविण्याऐवजी संयुक्त राष्ट्रांच्या नावाने तो पाठवावा, अशी सूचना पाकिस्तानने सुरुवातीला केली होती. मात्र, ती फेटाळून अफगाण ट्रकचालकांद्वारे ही वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रतिसूचना भारताने केली. ती मान्य होण्याची चिन्हे आहेत.
सव्वादोन कोटीवर लोकांची उपासमार
अफगाणिस्तानात सध्या सुमारे दोन कोटी ३० लाख लोकांना अन्नधान्याची कमालीची टंचाई भेडसावत आहे. सुमारे ३२ लाख मुले कुपोषणाच्या खाईत लोटली जाण्याचा धोका आहे. तातडीने पावले न उचलल्यास अफगाणिस्तानातील ९७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे.