हायलाइट्स:
- महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित सर्वाधिक
- करोना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करणार
- राज्याच्या आरोग्य विभागाने तयार केली ‘ब्ल्यू प्रिंट’
- करोना आणि ओमिक्रॉनला थोपवण्यासाठी राज्य सरकार सज्ज
देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ४५४ रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच, राज्य सरकारने त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. १५ जानेवारीपर्यंत उपलब्ध एकूण कोविड १९ बेडपैकी कमीत कमी ४० टक्के बेड सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सर्व जिल्ह्यांनी सुनिश्चित करायला हवे, असे ब्ल्यू प्रिंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडियाने’ हे वृत्त दिले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’नुसार, तीन दिवसांकरिता ऑक्सिजनच्या आवश्यकतेची तरतूद करावी आणि युद्धपातळीवर डॉक्टर आणि आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने भरती करावी. प्रत्येक विभागाला १० दिवसांपूर्वीच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या साठ्याबाबत लक्ष्य देण्यात आले होते. जिल्ह्यांना कदाचित तातडीने किंवा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ६० टक्के रुग्णांमध्ये सौम्य अथवा कोणतीही लक्षणे आढळणार नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.
देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित महाराष्ट्रात
महाराष्ट्रात काल, शुक्रवारी प्राप्त रिपोर्टनुसार, मागील २४ तासांत ८ हजार ०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात करण्यासाठी रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्गही वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे करोना संसर्गाचा दर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कठोर केले. ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी आहे. राज्यात एकूण ४५४ ओमिक्रॉन रुग्ण आहेत.