हायलाइट्स:

  • काल मुंबईत ५६३१ करोना रुग्ण आढळले होते
  • याचा अर्थ अवघ्या २४ तासांत करोना रुग्णांचा आकडा तब्बल ७०० ने वाढला आहे

मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दिवसागणिक मुंबईतील करण्यासाठी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईतील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. तसेच एका करोना रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात मुंबईत ६३४७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. काल मुंबईत ५६३१ करोना रुग्ण आढळले होते. याचा अर्थ अवघ्या २४ तासांत करोना रुग्णांचा आकडा तब्बल ७०० ने वाढला आहे. मुंबईत सध्या करोनाचे २२३३४ सक्रिय रुग्ण आहेत. तर शनिवारी ४५१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. गेल्या २४ तासांत मुंबईत ४७ हजारापेक्षा जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट करण्यात केले आहे. यापूर्वी २९ डिसेंबरला मुंबईत साधारण २५०० नवे करोना रुग्ण सापडले होते. मात्र, तीन दिवसांतच हा आकडा ६३४७ वर जाऊन पोहोचला आहे. मुंबईतील करोना रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्के इतका आहे. तर डबलिंग रेट २५१ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला १० कन्टेन्मेंट झोन असून १५७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईकरांना करोना नियमांचे कसोशीने पालन करण्याचा सल्ला दिला. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
‘मुंबईत करोना रुग्णांची संख्या सात दिवसांत सातपटीने वाढली, कॅज्युअली घ्याल तर किंमत मोजवीच लागेल’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here