सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष विशेषत: समर्थकांमध्ये सुरू झालेली टीकाटिप्पणी थांबायचं नावच घेत नाहीए. राणे समर्थकांनी आज एक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल करत शिवसेनेला डिवचलं आहे. त्या टीकेला गृहराज्य मंत्री यांनी गावाकडचा दाखला देत अत्यंत खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलनं महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत. राणे समर्थकांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी धरून त्याला नारायण राणे फरपटत नेत असल्याचं यात दिसत आहे. हा वाघ मांजरीसारखा दाखवण्यात आला आहे. या फोटोच्या माध्यमातून राणे समर्थकांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत शंभुराज देसाई यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी राणेंना सणसणीत टोला हाणला.

वाचा:

शंभुराज देसाई म्हणाले, ‘पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या. ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला लढत दिली असं सांगायचं हा केविलवाणा प्रयत्न आहे. राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला हे शोभत नाही. ही मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती. खूप मर्यादित मतदारांची निवडणूक होती. सार्वत्रिक निवडणुकीत पुढं या, लोकमताचा कौल घ्यायला पुढं या, मग कोकणातली आणि सिंधुदुर्गातील शिवसेना काय आहे हे नारायण राणे यांना कळेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here