करोनाचे संकट दिवसागणिक भयावह रूप धारण करत असून देशभरात ७००च्या जवळपास लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक बाधित राज्य म्हणून महाराष्ट्राचा क्रमांक आहे. राज्यात आतापर्यंत १३० लोकांना करोनाची बाधा झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यापुढं अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या जशा सामाजिक आहेत, तशा आर्थिकही आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढं येत आहेत.
देशातील अनेक मोठ्या उद्योजकांनी आतापर्यंत राज्य सरकारला करोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. कुणी रुग्णालयांमध्ये क्वारंटाइन कक्ष उघडण्यासाठी मदत केली आहे तर, कुणी आपल्या मालकीची रिसॉर्ट उपलब्ध करून दिली आहेत. अन्य उद्योजकांनी पैशांच्या स्वरूपात मदत देऊ केली आहे. स्वयंसेवी संस्था व संघटना आपापल्या परीनं या संकटकाळात मदतीचं काम करत आहेत.
राजकीय नेते मंडळीही यात मागे नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा करण्याची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आपल्या खासदार निधीतून १ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी २.६६ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. आता शिवसेनेच्या आमदार, खासदारांनीही राज्य सरकारला मदत देण्याची घोषणा केली आहे.
राजभवनाचे कर्मचारीही सरसावले!
महाराष्ट्राच्या राजभवनातील सर्व कर्मचारी व अधिकारीही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी आपला एका दिवसाचा पगार करोना मदत निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times